निसर्गावली
निसर्गाच्या साथसंगतीने मानवी जीवनचक्राचा प्रवास अविरतपणे सुरू आहे. निसर्गावर कधी कुरघोडी करून, कधी निसर्गाला आपल्या काबूत करून, तर कधी बेमुर्वतपणे निसर्गाला बाजूला सारून भौतिक विकासाची नवनवीन प्रारूपे मानव सर करीत आहे. खरेतर सखा, सुहृद म्हणून निसर्ग हा मानवाचा जीवनसोबती आहे; परंतु ही जाणीव अत्याधुनिकतेचा हव्यास बाळगणार्या मानवी मनांतून हरपत चालली आहे. प्रस्तुत संग्रहातील रचना या जाणिवेशी जवळचे नाते सांगण्याचा प्रयत्न करतात. निसर्गाहून सुटा होण्याचा कितीही आणि कसाही प्रयत्न मानवाने केला तरी निसर्ग सान्निध्यातच मानवतेचा बहर आहे, यावरील प्रगाढ श्रद्धाभाव या रचनांतून जाणवतो. प्राध्यापकी पेशाला आपल्या संवेदनशील वृत्तीने मानवी उन्नयनाचे कोंदण बहाल करणारा हा रचनाकार जाणिवा आणि अभिव्यक्ती यांच्याशी प्रामाणिक आहे. त्यामुळे कविता निर्मितीचे सूक्ष्म भान येथे नसले तरी अनुभूतीचा सच्चेपणा भावणारा आहे.