भावबंध
साहित्याच्या विविध प्रकारांपैकी 'कविता' हा साहित्यप्रकार अलीकडे खूपच वृद्धिंगत झालेला दिसतो आहे. कवींच्या सृजनशीलतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे हे काव्यविश्व समृद्ध होत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या घोडदौडीमुळे / प्रगतीमुळे कवि आणि कविता घरोघर पोहोचून प्रत्येक रसिकाला केवळ वाचायलाच नव्हे, तर प्रत्यक्ष पाहायलाही मिळत आहे, त्यामुळे कवितेचा वाचकवर्ग, प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे आणि कवितांना उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवताना दिसत आहे. कवितेच्या बाबतीत हे लक्षणीय आहे. काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची माझी खूप दिवसांची मनीषा होती, ती आता पूर्ण झाली आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहातील कविता म्हणजे माझा कवितेचा अभ्यास, मिळालेल्या प्रेरणा, मला आलेले विविध अनुभव, रसिकता आणि संवेदनशीलता यांचा संगम आहे. आजतागायत ह्या कविता माझ्या जीवनाबरोबरच माझी सोबत करीत आहेत, पुढेही करतील. सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून साकार झालेल्या ह्या कविता रसिकांना किती भावतील, आनंद देतील, हे मी सांगू शकत नाही, पण माझ्या मनातला हा 'भावबंध' रसिक वाचकांजवळ मोकळा केल्याचं समाधान मात्र मला नक्की मिळेल.
- प्रा. डॉ. सौ. चारुता गोखले