सृजनशोध
रूपेश नरहरी कऱ्हाडे यांचे 'सृजनशोध' हे पुस्तक एक गंभीर पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाने चर्चेला घेतलेले विषयही लेखकाच्या बौद्धिक प्रकृतीचा परिचय आपल्याला देतात. 'सृजनशोध' या पुस्तकातील चिकित्सेचे स्वरूप लक्षात येण्यासाठी लेखकाने मनाशी निश्चित केलेली मर्मदृष्टी समजावून घ्यावी लागते. रूपेश क-हाडेंची ही मर्मदृष्टी अंतर्विरोधविहीनच आहे असेच मी म्हणेन.'सृजनशोध' या पुस्तकात रूपेश कऱ्हाडेंचे चौफेर चिंतन साकार झाले आहे. त्यात आधुनिकतेचे चिंतन आहे. भाषेचे समाजशास्त्रीय चिंतन आहे... एखाद्या कादंबरीच्या नाट्यरूपांतराचे चिंतन आहे. मराठी कथेतील आंबेडकरवादाचे चिंतन आहे. जागतिकीकरणाचे आणि त्या निमित्ताने बदललेल्या भाषेचे चिंतन आहे, संगणकीय प्रतिमांचे चिंतन आहे, बाबासाहेबांचे शेतीविषयक चिंतन आहे. सरहद्दीवरील साहित्याच्या भाषेचे चिंतन आहे. रूपेश कऱ्हाडेंचे हे सर्व चिंतनविषय बघितले तरी त्यांच्या चिंतनाच्या विस्तारलेल्या क्षितिजाचा अदमास आपल्याला येतो. त्यामुळे त्यांचा बौद्धिक स्वभाव निरंतर प्रवाही राहिलेला आहे. ही बाब साधी नव्हे. भोवती अप्रस्तुततेला भरती आलेली असताना ते स्वतःला प्रस्तुत ठेवण्यासाठी स्वतःला 'ज्ञानसैनिक' म्हणून व्यस्त ठेवीत आहेत.
- यशवंत मनोहर