कादंबरी : वर्तमान, विचार आणि समस्या
मराठी वाङ्मयविश्वात समीक्षकांनी आजवर आंबेडकरी समीक्षा पद्धती नाकारली होती. दलितांनी तिची उपेक्षा केली. कादंबरी समीक्षा पद्धती समजून घेताना रंगनाथ पठारेंचं ‘आजची कादंबरी : नोंदी आणि निरीक्षणे’ या ग्रंथांचे वाचन करताना त्यांनी खंत व्यक्त केली होती, की मराठी कादंबरीची समीक्षा बहुतांशी विदेशी आहे. मग भारतीय समीक्षा पद्धती कोणती? तर ते म. सु. पाटलांच्या ‘तृष्णेचे काव्यशास्त्र’ ह्या सिद्धान्ताचा पुरस्कार करतात. तृष्णेचा सिद्धान्त पहिल्यांदा कुणी मांडला? तर बुद्धाने! मी ‘दलित कवितेतील हिंदुत्व’ लिहून बुद्धाला अग्रस्थानी ठेवले आहे. आजवर बुद्धाचा हात सोडला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक बुद्ध दिला. पहिल्यांदा बुद्धाच्या ज्ञानशास्त्रातून ‘वैज्ञानिक पद्धती’ निर्माण केली. शेवटच्या म्हणजे ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातून बुद्धाचे सत्ताशास्त्र मांडले. या ग्रंथात वैज्ञानिक पद्धती अनुसरलीय. या पद्धतीत सत्याला महत्त्व असते. सत्य सांगण्यासाठी ही पद्धती अनुसरलीय. सख्खी आईही सत्य मानत नाही तर हे लेखक सत्य स्वीकारतील का?