ओवीगीतातील बदलते मूल्य
प्रसंगापरत्वे स्त्रियांनी गायिलेल्या ओव्या म्हणजेच मौखिक लोकवाङ्मय आहे. समाजाच्या जडण-घडणीचा बरा-वाईट परिणाम स्त्रियांनी गायिलेल्या ओव्यांवर दिसून येतो. समाजात वेळोवेळी होणारे बदल ओव्यांमध्ये प्रकट झालेले दिसतात. लोकसाहित्य हे मौखिक स्वरूपातच असते. ही लोकपरंपरा निरीक्षरांमध्ये प्रचलित असते. एका पिढीपासून दुसर्या पिढीपर्यंत हा अनमोल ठेवा मौखिक स्वरूपात जपून ठेवलेला असतो. खानदेशातील दलित ओवीगीते हृदयस्पर्शी, जीवनस्पर्शी आहे. ही ओवीगीते अतूट असे भावबंध निर्माण करतात. या ओवींमध्ये खानदेशातील दलित जीवनातील अनेक बदलत्या मूल्यांची नोंद घेतली आहे.
विज्ञान दृष्टिकोणातून सिध्द झालेले दलित ग्रामीण जीवनातील परिवर्तन, शिक्षणामूळे त्यांच्यात झालेला बदल तीव्रतेने लक्षात येतो. जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील दलित ओव्यांचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचा उद्देश या पुस्तक लिखाणामागे आहे. ज्या महिला समाजापासून वंचित ठेवल्या गेल्या. त्यांचे लोकसाहित्य व त्यांचा समाज यांचे सर्वांगीण दर्शन लोकगीतांच्या माध्यमातून करण्याची भूमिका आहे.