लोकसाहित्याचा तौलनिक अभ्यास
खान्देश हा शांत व संपन्न लोकवस्तीचा प्रदेश म्हणून सर्वदूर परिचीत आहे. या खान्देशची मुख्य बोली अहिराणी आहे. अहिराणी बोलीला समृध्द परंपरा लाभलेली असून अहिराणी बोलीत लोकसाहित्य विपूल आहे. मौखिक लोकसाहित्यातील विविध प्रकारच्या रचनाबंधांनी अहिराणी लोकसाहित्य समृध्द आहे. संस्कृती, समाज, भाषा, लोकोत्सव, विधी परंपरा, चालिरीती, संकेत, श्रध्दा, वगैरेंचे समग्र दर्शन या लोकसाहित्यातून घडते. खान्देशची मुख्य बोली अहिराणी असली तरी या खान्देशी बोलीक्षेत्रात विविध बोलीही आपले स्वत्व व अस्तित्व जपून आहे. त्यात काही जातनिदर्शक, प्रांतनिदर्शक बोली दिसतात. त्यातील गुर्जर ही एक मुख्य जातनिदर्शक बोली होय. ही गुर्जर बोली ‘गुर्जर’ या लोकसमुहाची बोली आहे. गुर्जर बोलीतील लोकसाहित्य समृध्द असून त्यात लोककथा, लोकगीते, लोकोक्ती वगैरे लोकसाहित्यातील सर्व प्रकार आढळतात. प्रस्तुत पुस्तकात गुर्जर बोली व अहिराणी बोली यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.