गुर्जर बोली म्हणी, उखाणे आणि वाकप्रचार
‘गुर्जर’ या जातीची एक वैशिष्ट्यपूर्ण स्वतंत्र बोली आहे. ही गुर्जर बोली ‘जातनिदर्शक बोली’ असून तिला ‘गुर्जर बोली’ या नावानेही ओळखले जाते. ही गुर्जर बोली खान्देशातील अहिराणी या बोलीपेक्षा स्वतंत्र, वेगळी व वैशिष्टपुर्ण बोली आहे. लोकसाहित्यातील म्हणी, उखाणे, वाक्प्रचार ही महत्त्वाची अंगे असून यामुळे लोकसाहित्य हे समृध्द आहे. म्हणी, उखाणे प्रमाणेच वाक्प्रचारांची निर्मिती ही सहज व उत्स्फूर्तपणे, नकळत होत असते. लोकजीवनातील संज्ञापनप्रसंगी स्वाभाविकपणे प्रसंगोपात म्हणीप्रमाणेच वाक्प्रचार मूर्तरूप धारण करीत असतात. हे वाक्प्रचार म्हणीसारखेच असतात. म्हणी व वाक्प्रचारांच्या रचनेत साम्य असते. परंतु वाक्प्रचारापेक्षा म्हणी ह्या रचनेदृष्ट्या लांबट व पसरट असतात. तर वाक्प्रचार हे लहान-लहान असतात. शब्दांचा वापर म्हणीपेक्षा वाक्प्रचारात कमी असते. प्रस्तुत पुस्तकात गुर्जरी बोलीतील म्हणी, उखाणे व वाक्प्रचार यांचा लोकसाहित्याच्या अंगाने अभ्यास करण्यात आलेला आहे.