मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती
समाजाची पाळेमुळे संस्कृतीत खोलवर रूजलेली असतात. त्या त्या समूहांच्या जीवनसरणीनुसार त्या समूहाची संस्कृती आकाराला येत असते. त्यामुळे प्रत्येक समूहाची संस्कृती परस्परांहून भिन्न असते. ही भिन्नता, वेगळेपणा त्या समूहाच्या कला, साहित्य, रूढी, परंपरा, समजुती, धारणा, श्रद्धा, नैपुण्य, क्षमता, गरजा, नैतिक संकल्पना, जीवनपद्धती अशा अनेक गोष्टींमधून प्रत्ययाला येते. समाजातील राजकीय, आर्थिक, सामाजिक संस्थाही त्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. अशा अनेक समूहांच्या सहअस्तित्वातून मानव समाज तयार होत असतो. रूढार्थाने आपण भारतीय संस्कृतीचे पाईक आहोत, आपण भारतीय संस्कृतीचे लोक आहोत, मर्यादित अर्थाने ते खरेदेखील आहे. आदिम काळापासून चालत आलेल्या लोकसंस्कृतीचा आणि लोकजीवनाचा आविष्कार लोकसाहित्यात झालेला आहे. आदिम जीवन जगणार्या लोकांनी निर्माण केलेल्या लोकसाहित्यामध्ये जगभराच्या आदिम मानवी जीवनाचे दर्शन घडते. जगदगुरु संत तुकाराम महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करीत मराठी साहित्याच्या चळवळी विकसित झाल्या तर मराठी समाज, संस्कृतीचे आशादायक प्रतिबिंब मराठी साहित्यात दिसेल असा आशावाद व्यक्त करायला हरकत नाही.