साहित्याचे वर्तमानभान
‘साहित्य हा समाजाचा आरसा’ हे प्रचलित विधान पुष्कळअंशी खरे समजायला वाव आहे. कारण, कोणतेच साहित्य पिकांसारखे जमिनीतून उगवत नसते अथवा आकाशातून पाऊसधारांसारखे तसे बरसत नसते. साहित्याच्या निर्मितीला हाडामांसाचा माणूसच कारण ठरतो आणि हा माणूस समाजात वावरणारा; कौटुंबिक अशा प्रकारचाच असतो. साधा माणूस आणि लेखक यांच्यातील निराळेपण नोंदविणारी एक रेघ मारता येऊ शकते. जी संवेदनक्षमता, प्रातिभिक सामर्थ्य, बुद्धगम्यता आणि सर्जकसुज्ञता या स्तरांवर ती रेघ स्पष्ट करता येऊ शकणारी आहे. कवितेचा स्वभाव ओळखताना, मराठवाड्यातील कवितेचा वेध घेताना, चळवळींचीच कविता अभ्यासताना लेखकांचे जीवनजाणिवा मूल्य पारखताना आणि एकूण साहित्याची भाषा तसेच साहित्याचे रंग न्याहाळताना जाणवलेले, अनुभवलेले ‘साहित्याचे वर्तमानभान’ ग्रंथात मांडावयाचा यत्न केलेला आहे.