बाई आणि कविता
‘बाईची जात आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहाद्वारे कवी जयवंत बोदडे यांनी मराठी काव्यप्रांतात स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. बाईचे दुःख उजागर करणारा कवी, ङ्गबाई आभाळासारखी अनंत असते. बाई धरणीसारखी मायाळू असते, एवढेच उदात्तीकरण करून थांबत नाही तर बाईच्या वाट्याला येणारे शोषण मुखर करतांना पुरुष बाईला घाबरत असतो, हे महत्त्वाचे निरीक्षणही तटस्थपणे नोंदवीतो. जयवंत बोदडे यांची कविता ही अखिल मानवतावादाचा विचार करणारी आहे. चोवीस तास ऑनलाईन असणार्या माणसाला प्रत्यक्षात समोर असणार्या माणसासाठी वेळ नाही म्हणून माणसातला माणूस कळत नाही की माणसाला माणूस जुळत नाही, माणूस माणसासारखा वागत नाही उलट तो माणसाच्याच पाठीत सुरा खुपसतो अशा मेलेल्या माणसाविषयी कवीचा स्वर कडवट असला तरी निराशावादी नाही. मानवी मनाला जडलेले हे अहंकाराचे पापुद्रे तथागताच्या सानिध्यात गळून पडतील म्हणून कवी तथागतास शरण जातो. जयवंत बोदडे यांची कविता सरळ, स्पष्ट, वस्तुनिष्ठ स्थितीचे निवेदन करणारी आहे. या कवितेतील भावार्थ लक्षात घेतला तर त्यातली प्रासादिकता ठळकपणे जाणविते. कवितेत माणसाचं जगणं मांडणार्या या कवितेचा भविष्यकाळ निश्चितच उज्वल आहे.
- डॉ. वासुदेव वले
पाचोरा ता.पाचोरा जि.जळगाव