अस्वस्थ कार्यकर्त्याची कविता एक अन्वयार्थ
एकंदर चळवळींच्या चवदार तळ्याचे पाणी पिऊन धैर्याने उभ्या राहिलेल्या आंबेडकरवादी कवितेने प्रचलित साहित्याला हादरे दिले, हे सर्वश्रुत आहे. कारण ही कविता समता आणि मानवता यांचा अंगीकार करीत नवे सामाजिक, सांस्कृतिक मानदंड स्थापित करणारी ठरली. विद्रोह हे तिचे महत्त्वाचे मूल्य राहिले तर चिंतन ही या काव्याची अर्थात अढळ बाजू राहिली. त्यामुळे, चळवळींची कविता जागतिक आकाश हस्तगत करणारी ठरली. शेषराव पिराजी धांडे हा नव्या पिढीतील प्रतिभावंत युगाची व्यथा वाचणारा प्रतिभावंत! शेषरावची कविता पूर्णतः सामाजिक असून ती प्रखर वास्तवाला कवेत घेणारी कविता आहे. अस्वस्थ मनाचा हा कार्यकर्ता आणि कवी विद्रोहाची ललकारी जेव्हा देतो, तेव्हा तो एकूण मानवतेच्या स्थापनेचा समाजाला कवितेतून वचनाप्रमाणे शब्दच देतो. संविधानाने यथार्थ दिलेला लोकशाहीनिष्ठ शब्द आणि त्या शब्दाला जागणारे तसेच जागविणारे भान शेषराव पिराजी धांडे यांच्या कवितेने प्रतिष्ठेप्रमाणे जपलेले आहे. म्हणूनच मानवतावादी शेषरावची कविता ही माणसांची आणि सतत समकालाची कविता ठरते, हे सत्य आहे! समाज परिवर्तननिष्ठ साहित्याचे महत्त्वाचे तरुण अभ्यासक डॉ. संजय कांबळे यांनी अत्यंत साक्षेपाने आणि खूप मेहनत घेऊन शेषराव सारख्या अस्वस्थ अशा कार्यकर्त्याच्या कवितेचे हे संपादन चळवळींच्या साहित्यात संदर्भ म्हणून नक्कीच महत्त्वाची भर घालणारे संपादन आहे. भूमिकेचा दाखला म्हणून आणि चिंतनाची समग्र भक्कमता म्हणून चळवळींचा आवाज पुढे घेऊन जाण्याच्या सर्व क्षमता या संपादनामध्ये निश्चितच आहेत!