निवडक फरमान
साहित्याच्या इतर वाङ्मय प्रकारात लिहिणे आणि कवितेमधून लिहिणे यात एक मूलभूत असा भेद असतो. कविता हा कमालीचा व्यक्तिगत अगर कवीच्या अंतरंगाशी एकरूप झालेला लेखन प्रकार असतो. ही व्यक्तिगतता जशी महत्वाची असते त्याप्रमाणेच कविता लिहिणार्या कवीला शब्दांकडे आणि कवितेच्या रूपाकडे फार बारकाईने लक्ष द्यावे लागते. शब्दन् शब्द तोलून मापून वापरावा लागतो. बा. सी. मर्ढेकरांच्या भाषेत सांगावयाचे तर शब्दांच्या अलवार कडा कवीला जपता आल्या पाहिजेत. सुदैवाने कवी वा. ना. आंधळे यांना याचे फार चांगले भान आहे. त्यामुळे ते शब्दांचा नेटका वापर करतातच पण लय, नाद आणि छंद यांचीही त्यांना उत्तम जाण आहे. त्यामुळे त्यांची कविता सहज गेयरूप धारण करून जाते. या त्यांच्या काव्यप्रकृतीमुळेच त्यांनी फार चांगल्या गझला लिहिल्या आहेत. या गझलांमधून आणि एकूणच कवितेमधून ते भोवतीच्या समाजाला प्राप्त झालेल्या दुरावस्थेचे फार परिणामकारक चित्र रेखाटतात. किंबहुना समाजस्थितीच्या सूक्ष्म निरीक्षणामधूनच त्यांची कविता फुलत जाते. या निरीक्षणाबरोबरच उपहास आणि उपरोध ही त्यांची शस्त्रे आहेत. आणि ही शस्त्रे चांगलीच परजलेली असल्यामुळे कवितेची प्रतीतीक्षमता तर वाढतेच पण ती धारदारही होऊन जाते त्यांच्या कवितेच्या वाटचालीस शुभेच्छा.
- नागनाथ कोत्तापल्ले