सनातनविषयी...
मराठी भाषेत लेखन करतांना भारतीय लेखक म्हणून जागतिक मान्यता मिळालेले जे चार-सहा लेखक आहेत, शरणकुमार लिंबाळे हे त्यापैकी एक आहेत. प्रत्यक्ष मानवी वर्तन आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान यांतील तफावत शरणकुमार लिंबाळे यांनी वेळोवेळी रेखाटली आहे. लेखक म्हणून लिंबाळे नेहमीच सत्याची कास धरतात, त्यामुळे व्यवस्थेला ते कधीही ‘आपले’ वाटले नाहीत. उच्चवर्णीय तसेच बहुजन अशा दोघांनाही लिंबाळे आरोपीच्या पिंजर्यात उभे करून प्रश्न विचारतात. लिंबाळे यांची लेखक म्हणून चार दशकांची वाटचाल ही स्पष्टवक्ता, निडर अशीच राहिली आहे. शरणकुमार लिंबाळे यांच्यासारखा लेखक हा जसा सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्थेला चालत नाही. तसा तो गटा तटात अडकलेल्या साहित्य व्यवस्थेलाही चालत नाही. त्यामुळे ‘सनातन’ चा राष्ट्रीय पातळीवर गौरव होत असताना मराठी साहित्यविश्व तोंडात मिठाची गुळणी धरुन बसले होते. लिंबाळे यांचे मोठेपण मान्य करण्यास मराठी साहित्यविश्वाने कुचराई केली. या पार्श्वभूमीवर डॉ. सतेज दणाणे यांचा हा संपादित ग्रंथ महत्त्वाचा आहे.
समाविष्ट अकरा लेखांतून मराठीतील जेष्ठ समीक्षकांनी ‘सनातन’ चा सर्वांगीण धांडोळा घेऊन या कादंबरीचे मोठेपण अधोरेखित केले आहे. मुलाखतीतून साधलेला संवाद लिंबाळे यांची उंची वाढवतो.
डॉ. दणाणे यांचा हा संपादित ग्रंथ शरणकुमार लिंबाळे यांच्या साहित्यकृतीची नवी मीमांसा वाचकांपुढे घेऊन येत आहे, वाचक व अभ्यासक प्रस्तुत ग्रंथाचे नक्कीच स्वागत करतील.
- डॉ. पृथ्वीराज तौर,
मराठी विभाग,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड