खान्देशचा लोकनाट्य तमाशा
‘खान्देशचा लोकनाट्य तमाशा (लोककला आणि साहित्य)’ हे नुसतं एक पुस्तक नाहीय तर भूतकाळात हरवून गेलेल्या आणि गाढल्या गेलेल्या तमाशा कलावंतांची ही वेदना आहे. या वेदनेला पुन्हा समाजासमोर आणून या कलेची आणि कलाकारांची ओळख करून देणारा हा एक काटेरी प्रवास आहे. याला काटेरी प्रवास का म्हणतोय; कारण तमाशा जगलेली माणसं ही फुलांच्या रस्त्यावर कधी आलीच नाहीत. पण काट्यावर चालता चालता या लोकांनी समाजाच्या ओंजळीत आनंदाची फुलं मात्र निःस्वार्थीपणाने भरभरून दिलेली आहेत. प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखकाने तमाशात काम करणार्या कलावंतांची जशी माहिती समोर आली अगदी त्याच ताकदीने आणि परिश्रमाने तमाशासाठी लिखाण करणार्या त्या काळातील लेखकांना सुद्धा जगासमोर आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खान्देशी तमाशाचा आणि लोककलेचा अभ्यास करत असताना त्यांनी अहिराणी भाषेतून सादर होणार्या तमाशाचा सुद्धा उलगडा केला आहे. जास्त विस्तृत लिहिण्यापेक्षा आतल्या पाना पानांवर तुम्हाला एक वेगळा अनुभव निश्चित येत राहणार आहे. जगण्याचा तमाशा करून घेणारी माणसं या मातीतील लोककला जिवंत ठेवता ठेवता काळाच्या पडद्याआड जातात. पिढ्या संपतात तशी स्मृतीतून ही निघून जातात. पण जर अस कुणी लिहिलं तर ती माणसं, ती कला आणि ते कलावंत कधीच मरत नाहीत. ते अजरामर होतात. - ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे