अ ब्रिलियंट इन्स्पायरेशन - तारुण्याच्या पायरीवर
खरे तर आजच्या तरुण-तरुणींना काहीही शिकवू नये, त्यांना फक्त विचार करायला शिकवले पाहीजे. तोच प्रयत्न ह्या छोट्याशा पुस्तकाद्वारे केला आहे. प्रस्तुत पुस्तकातून युवास्फूर्ती, आत्मविश्वास, आशा-निराशा, आळस, ध्येय, दृष्टिकोन, आत्मपरिक्षण, आत्मप्रतिमा इत्यादी बाबी वाचून युवक - युवती हे नक्कीच सकारात्मक सुविचार करायला लागतील आणि त्यांचे जीवन बहुरंगी सर्वांगसुंदर घडेल. दगडाला मूर्तिरूप दिल्याने देवपण येते, परंतु माणसाला त्याच्या कर्माने देवपण येते याची जाणीव युवक-युवती नक्कीच ठेवतील. नराचा नारायण होण्यासाठी तरुण पिढीने कर्माची कास धरावयासच पाहिजे, असे देवबा पाटील आपल्या पुस्तकातून सांगतात. तरुणांनो उठा, आळस झटकून उभे राहा, नशिबाला दोष देऊ नका, नैराश्याला थारा देऊ नका. तुमच्या ध्येयाच्या कार्याची दिशा ठरवा नि त्या ध्येयपूर्तीसाठी जोमाने कामाला लागा. यशाची शिखरे तुमची आतुरतेने वाट बघत आहेत आणि तुम्ही ती शिखरे नक्कीच गाठणार आहात. अशाप्रकारची मुद्देसूद मांडणी 'अ ब्रिलियण्ट इन्स्पायरेशन - तारुण्याच्या पायरीवर' ह्या प्रेरणादायी पुस्तकात केलेली असून हे पुस्तक तरुण पिढीसाठी अतिशय उपयुक्त आहे.