तेवढेच संदर्भ आमचे
डॉ. मिलिंद विनायक बागूल यांच्या कविता भारतीय परिवेशातील कविता आहेत. रोजच्या जगण्यात येणारे अनुभव, डोळ्यांसमोर दिसणारे प्रसंग ते कवितेतून अतिशय सहृदयतेने आविष्कारतात. आपला देश हा जाती धर्माच्या डोहात आकंठ बुडालेला आहे. ईथे प्रत्येकाच्या डीएनएत जातीवाद कुटून- कुटून भरला आहे. त्याचा मानसिक त्रास जाती धर्मांच्या नावाने नागावलेल्या बहुसंख्य लोकांवर होतो हे तोच वंचित माणूस अनुभवू शकतो ज्याला याचा 'शॉक' लागतो. हे 'शॉक' लागणे मिलिंदजींच्या कविता उजेडात आणतात आणि या सहिष्णूतेचे सोंग घेतलेल्या तथाकथित सुबुद्ध समाजासमोर ठेवतात. कविचे कर्तव्य हेच असते आणि ते प्रामाणिकपणे निभावत आहेत. आमच्या देशात कालचे सवर्ण आज अस्पृश्य होतात अन् आरक्षण मागायला रांगेत धावतात. हे ईथले नागडे सत्य मिलिंदजी आपल्या वास्तवी कवितेतून उजागर करतात हेच त्यांच्या कवितेचे निराळेपण आणि शक्ती आहे.
- लोकनाथ यशवंत