संदर्भासहित २
दै. लोकसत्ता मधून २००६ व २००७ अशा सातत्याने दोन वर्षे चाललेल्या 'संदर्भासहित' या शीर्षकाच्या वाचकप्रिय स्तंभलेखनापैकी २००७ या दुसऱ्या वर्षातील स्तंभलेखनाचा हा संग्रह आहे. हा स्तंभ व हे स्तंभलेखन विविध महत्त्वाचे विषय, घटना, प्रसंग यांचे संदर्भ उलगडून दाखवणारे विश्लेषक लेखन असून ते एका सृजनशील, संवेदनशील लेखक-कवीचे सामाजिक वैचारिक गद्य आहे. कवीची भावात्मकता त्याच्या मुळाशी आहे. कर्कश वैचारिकता, एककल्ली अहंमन्यता, फुटकळ आवाहनबाजी टाळणारे हे लेख आहेत. नासलेल्या, कुजलेल्या, किडलेल्या, शोषल्या गेलेल्या, कोरड्या ठणठणीत पडलेल्या सामाजिक-राजकीय- वैचारिक-भावनिक अशा व्यवस्था वास्तवाला आवश्यक व यथायोग्य त्या मानवी संवेदनांच्या ओलाव्याचा पुरवठा करण्याचे प्रयोजन या लेखनाला आहे. "अशा प्रकारच्या लिखाणाला परिवर्तनाच्या विचारांची मोठीच किनार असते. हे लेखनही त्याला अपवाद नाही. प्रत्येक विषयाचा उहापोह करतांना लेखकाची उर्जा, असोशी, त्यामागची तळमळ, विधायक बदलाची तीव्र मनीषा यांचे मनोज्ञ दर्शन होते. त्यामुळे असे लेखन प्रत्येक वाचनप्रेमींनी नुसते वाचून नाही, तर त्यावर विचार करून आणि स्वतः आवश्यक ते बदल करत आत्मसात करायला हवे,"