बापाच्या स्मृतीतला भागवत
वस्तुतः 'बापाच्या स्मृतीतला भागवत' हे आत्मकथन केवळ एका व्यक्तीचे नव्हे तर कुटुंबातील विशेषतः आई वडील, आप्तष्ट, सवर्ण मंडळी, गाव, सहवास लाभलेल्या अनेक व्यक्तिंचे आहे. त्यामुळे जीवनाचा एक फार मोठा पट वाचकांच्या डोळ्यांसमोरुन सरकत राहतो. खानदेशातील संस्कृतीचे दर्शनही घडते ते वेगळेच. भागवतराव सोनवणे प्रारंभीच आपल्या आजीचा प्रभाव आपल्या जडणघडणीत कसा आहे ते विशद करतात. ' . परंतु बाप 'भादू' आणि आई सायंका ह्यांचा निरंतर लाभलेला सहवास आणि त्यांचे संस्कार पुसून टाकता येत नाहीत. आई वारकरी पंथाची तर बाप कबीर पंथी विचारांचे वाहक. वडिलांना समाजकार्याची आवड. पुढे तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत सहभाग. साने गुरुजींचाही सहवास.
एकूणच भादूंचे जीवन रोमहर्षक आहे, यात शंका नाही. टाकरखेडे गाव भारतातील कोणत्याही गावातील विविध जाती समुहाचा परिपाकच. महार-मांगांना मंदिर प्रवेश बंदी, सण, जत्रा पारंपरिक अस्पृश्यांना शाळेच्या व्हरांड्यात बसून शिक्षण. भादूंचे जीवन याच चक्रातून गेलेले. पुढे अमळनेरला बाबासाहेबांचे दर्शन झाले आणि भादूंचे जीवनच बदलले. बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचारांना घेऊन त्यांनी आपल्या गावातच सामाजिक कार्याला प्रारंभ केला. लोकजागृतीचे कंकण बांधले. बाबासाहेबांच्या आदेशानुसार त्यांनी समाजबांधवांना सांगितले. 'मेलेली ढोरे ओढू नका.' 'सवर्णाची चाकरी करु नका', 'शिळ्या भाकरी मागू नका', 'मुलांना शिकवा' हे सारे गावाला आश्चर्यकारक होते. म्हणून सवर्णांनी भादूंचा कडवा विरोध केला. अशावेळी कार्यकर्त्याला जीव मुठीत घेऊन जगावे लागते. बापाच्या ह्या अवस्थेचे भागवतरावांनी केलेले वर्णन स्पर्शी आहे.
- डॉ. गंगाधर पानतावणे