बाप
रमेश पवार हे मराठी काव्य जगतात स्वतंत्र नाममुद्रा उमटवणारे कवी आहेत. यापूर्वी त्यांचे 'एक माळरान ओसाड (२००९) आणि 'गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ' (२०२२) असे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ग्रामीण आणि कृषी जीवनाचे वेधक चित्रण त्यांनी केले आहे. जागतिकीकरणाच्या प्रभावाने गावगाड्याची झालेली पडझड व शेतीमातीच्या वेदना त्यांनी अस्सलपणे मांडल्या आहेत. ग्रामीण कष्टकरी 'शेतकरी बाप' हा त्यांचा आस्थेचा विषय आहे. बापाची विविध रूपे त्यांनी साकार केली आहेत. 'गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ' ह्या काव्यसंग्रहात इतर कवितेसह बापावरच्या जवळपास बेचाळीस कविता आहेत. त्या अतिशय चिंतनशील आहेत, अंतर्मुख करणाऱ्या आहेत. अनेक वाचकांनी व मान्यवर साहित्यिकांनी त्यांच्या कवितेचा पुरस्कार केला आहे.
डॉ. रमेश सूर्यवंशी हे अहिराणी बोलीभाषेचे व्यासंगी आणि चिकित्सक अभ्यासक आहेत. त्यांनी कवी रमेश पवार यांच्या बेचाळीस कवितांचा अहिराणी भाषेत अनुवाद करून 'बाप' हे पुस्तक निर्माण केले आहे. मुळात काव्य अनुवाद ही प्रक्रिया तशी फार जिकरीची असते. मूळ भाषेतल्या कवितेच्या आशयाला धक्का पोहचू न देता तोच भाव तितक्याच ताकदीने अनुवादकाने मांडायचा असतो, आणि ते आवाहन डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी लीलया पेलले आहे. मूळ कवितेचे सामर्थ्य ओळखून तितक्याच ताकदीने त्यांनी हा उत्कट भावानुवाद केला आहे. तो अहिराणीसह मराठी वाचकांनाही निश्चितच भावणारा आहे. इतका अस्सल आहे. म्हणून वाचक या आगळ्या-वेगळ्या पुस्तकाचे नक्कीच स्वागत करतील. असा विश्वास वाटतो.
डॉ. रमेश माने