स्त्री कर्तृत्वाची ओवीमाला
पहिल्या चरणात या महानायिकांना प्रणाम करून कवयित्री त्यांच्या आयुष्याचा तेजस्वी प्रवास जसजसा चितारत जातात तसतसा वाचकाच्या मनःचक्षुसमोर जणूकाही एक चलचित्रपट साकारत जातो. महानायकांच्या व्यक्तित्वाची आणि कर्तृत्वाची विविधांगी रूपे एखाद्या विशाल पट असणाऱ्या चरित्रग्रंथाला पेलावी लागतात. ते कौशल्य केवळ एका ओवीमालेतून मोठ्या परिणामकारकतेने येथे साकारलेले आहे. ही ओवीमाला वाचत असतांना कवयित्रींच्या इतिहासाचे सूक्ष्म अध्ययन, अवलोकन आणि व्यासंग आणि ऐतिहासिक घटनाप्रसंगांचे सम्यक ज्ञान किती सखोल आहे याचा सतत प्रत्यय येत जातो. इतिहासकालीन महानायिकांच्या असामान्य कर्तृत्वाला आपल्या ओवीमालेत गुंफताना सुनिता येवले यांच्या काव्यप्रतिभेला नवेनवे उन्मेष प्राप्त होत जातात. संत ज्ञानेश्वरांनी काव्यप्रतिभा ही नवोनवोन्मेषशालिनी असते असे म्हटले आहे. त्या प्रतिभेची अनुभूती ही ओवीमाला वाचताना सातत्याने होत राहते. (प्रस्तावनेतून...)