मृत्यू घराचा पहारा
कोरोना व्हायरस (कोविड १९) या विषाणूच्या प्रादुर्भावाने सारे विश्व एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. पूर्वी गर्दीत माणूस हरवलेला होता. आता तो स्वत:च या कोरोना संकटात हरवलेला आहे. पण मित्रांनो, माणुसकी हरवलेली नाही. हजारो हात आज माणुसकी तळहातावर जपत ‘देवदूत’ बनून काम करीत आहेत. मग ते डॉक्टर्स असोत वा नर्स, सफाई कर्मचारी असोत की अन्य कोणीही... पोलीस दलसुद्धा ‘देवदूत’ बनूनच अहोरात्र काम करीत आहे. कितीतरी पोलीसांनी कोरोना काळात कर्तव्य बजावताना बलिदान दिलेले आहे. ‘ड्यूटी इज ड्यूटी... अॅन्ड ड्यूटी फर्स्ट’ असे ब्रिद घेऊन पोलीस बंधू-भगिनी जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत आहेत. श्री. विनोद अहिरे हे जळगाव येथे प्रत्यक्ष कोरोना कक्षातच कार्यरत असताना मरणाच्या दारातही आपल्यातील संवेदनशीलतेला मोकळी वाट करून देत त्यांनी स्वत:चे काही अनुभव, काही भावना अगदी प्रामणिकपणे मांडल्या आहेत.