वसंतराव नाईक : नेतृत्व आणि विकास
वसंतराव नाईक यांचे नेतृत्व ग्रामीण भागातून उदयास आले आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, कृषीविषयक व शैक्षणिक जडणघडणीत वसंतराव नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राचे मंत्री व मुख्यमंत्री म्हणून कार्य करताना सामान्यातील सामान्य व्यक्ती केंद्रबिंदू ठरवून आपल्या विकासात्मक कार्याची वाटचाल केली आहे. शेतकरी हा भारतीय समाजव्यवस्थेचा कणा आहे. ‘शेतकरी जगला तरच देश जगेल’ अशी धारणा वसंतराव नाईकांनी सातत्याने ठेवून शेतकरी व शेतीच्या विकासासाठी जिवाचे रान केलेले दिसून येते. राजकीय क्षेत्रात सामान्य नागरिक लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य घटक बनावा याकरिता लोकशाही विकेंद्रीकरणावर त्यांनी भर दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची रचना अतिशय सुकर बनली.