मांडूळ
‘मानवी जीवनातील सर्व शक्यतांचा साठा कथांमध्ये सामावलेला असतो,’ या विधानाची पुष्टी करणारा ‘मांडूळ’ हा कथासंग्रह आहे. नव्वदोत्तर कालखंडात कथेच्या प्रवाहाचे सत्त्व आणि तत्त्व टिकविण्याचे मोठे आव्हान कथाकारांसमोर आहे; हे लक्ष्यात घेता जीवनातील घुसमट, भडास, घालमेल, विकृती-संस्कृती, जगण्याचे पेच, क्रुरता, हिंसा, आकस; त्याचबरोबर प्रेम, लळा, वात्सल्य या सार्या भावभावनांचे उत्तम आणि मनोवेधक चित्रण कथाकार जयवंत बोदडे यांच्या कथांचे वैशिष्ट्य आहे. समग्र जीवनाचे सम्यक आकलन करून शोषण आणि अंध:पतन हे समकालीन वास्तव शब्दांच्या चिमटीत नेमकेपणाने पकडण्याचे कसब कथाकारास साधले आहे. जागतिकीकरणात चंगळवादाने नागवलेल्या व्यवस्थेत माणूस कळसूत्री बाहुला बनला आहे, याचे भेदक आणि वेधक चित्रण या कथांचे सारतत्त्व आहे.