पाश्चात्त्य विचारवंतांचा सुखवादी विचार
प्रा. डॉ. गवरे यांचे प्रस्तुत पुस्तक हे तत्त्वज्ञानातील एका विषयाची प्राथमिक ओळख करून देणारे आहे. तत्त्वज्ञानाच्या प्रांतात, विशेषत: पाश्चिमात्य परंपरेमध्ये तात्त्विक विषय, भूमिका, सिद्धांत, प्रणाली, विचारप्रवाह, वैचारिक आचारविचारांच्या संस्कृतींचे आयाम व इतिहास इत्यादींचा ऊहापोह त्यांच्या विशिष्ट पद्धतीने गेल्या किमान अडीच सहस्त्रकांपासून होत आला असून, आजही तो अधिक जोमाने विकसित व प्रगत होत असल्याचे दिसत आहे. प्रा. डॉ. गवरे प्रस्तुत पुस्तकात ‘सुखवाद’ या विषयाची ओळख पाश्चिमात्य तत्त्वज्ञान परंपरेच्या आधारे करून देत आहेत. पाश्चिमात्य परंपरेतील सत्ताशास्त्र प्रामुख्याने अधिभौतिकोन्मुख दिसते, तर भारतीय परंपरेतील सत्ताशास्त्र आध्यात्मिकवृत्युन्मुख असल्याचे दिसते. या गोष्टी परस्परविरोधी म्हणून न पाहता त्यांच्यातील परस्परावलंबी पाहिल्यास आपण पूर्णत्वोन्मुख द़ृष्टिकोनातून आपले जग व जीवन समजू शकू, जगू शकू. याद़ृष्टीने डॉ. सुनिलदत्त गवरे यांचे प्रस्तुत पुस्तक एक उद्बोधक पूर्वार्ध ठरतो व तो तसा त्यांनी श्रमपूर्वक प्रयत्न केला आहे