काव्यप्रदेशातील स्त्री
मराठी भाषेतील काव्यदालनात विविध वृत्ती आणि प्रवृत्ती सातत्याने आलेल्या आहेत. माणसाच्या विशुद्ध भावनांचा परिपाक म्हणजे मराठीचे समृद्ध काव्यदालन होय. ह्या काव्यविष्कारात निसर्गाचे सर्वांगसुंदर रूप आणि सामर्थ्य म्हणजे स्त्री होय. निसर्गाच्या ह्या समर्थ रुपाला कधी आई, बहीण, भार्या, प्रेयसी, मुलगी अशा विविध नावांनी संबोधित केले गेले आहे. करुणा, त्याग, प्रेम, सोशिकता, वात्सल्य आणि असीम समाधान ह्यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे स्त्री. ह्या स्त्रीला कधी देवी म्हणून पुजले गेले, तर कधी तिच्यावर अन्याय-अत्याचार करून तिची अवहेलना केली गेली. मराठीतील अगदी जनाबाई फुले, सावरकर, केशवसुत ते अगदी आजपर्यंत सर्वच कवींनी स्त्रीजीवनाचे हे पैलू शब्दांकित केले आहेत. त्यापैकी निवडक कवींच्या काव्यरचनांचा अभ्यास करून किरण शिवहर डोंगरदिवे ह्यांनी त्या काव्यातील स्त्री प्रतिमा, प्रतीके, स्त्री पात्र आणि स्त्रीच्या जीवनातील उपेक्षा, आशा-निराशा आणि इतर विविध पैलूंच्या अंगांनी विचार करून मराठी काव्यातील स्त्रीदर्शन घडविले आहे. त्यांच्या ह्या अभिनव आणि काव्यप्रांत आणि स्त्रीजीवन ह्यांचा समन्वय साधण्याचा केलेला प्रयत्न अतिशय प्रशंसनीय असून, अशा प्रयोगातून मराठी काव्याच्या विविध पैलूंचा विचार समोर येईल.