पालवी
कवयित्री इंदिराताई जाधवांची कविता स्त्रीचा स्वाभिमान जागृत करणारी असून, त्यांच्या कवितातून अनुभवसंपन्नता, कारुण्य, निसर्गातील अनेक घडमोडी झिरपताना दिसतात. हे झिरपणे कुणाच्या तरी जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारे असेच आहे, तर कुणावर अन्याय झालेल्यांना बंड करून उठण्याची ऊर्जा देणारे असेच आहे. आपल्यातील माणुसकी जागविण्याची, प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती अधिकाधिक बळावत कशी जाईल, त्यातून माणुसकीचे भावबंध कसे जोपासले जातील, हाच एक विचार त्यांची कविता मांडत असते. कवयित्री इंदिराताई जाधव यांनी ‘पालवी’ काव्यसंग्रहातून व्यक्त होत जीवनानुभव मांडत स्त्री आणि तिचे सुखदु:ख, भावभावना, निसर्गाने निर्माण केलेल्या सृष्टीने माणसाला दिलेले वरदान त्या बदल्यात माणसाने बदललेल्या आपल्या वागण्याच्या तर्हा, इथली समाजव्यवस्था या सार्या गोष्टींवर आपल्या कवितांच्या माध्यमातून मांडणी केलेली आहे. त्यांची कविता समाजातील वास्तवतेला मांडत माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींचा समाचार घेणारी आहे, जाब विचारणारी आहे. स्त्रीच्या स्वाभिमानी जगण्याला सर्वार्थाने अर्थ प्राप्त करून देत स्त्री-पुरुष समानतेचा ध्वज उंचावणारी अशीच आहे. त्यांच्या कविता वाचकाला निश्चितपणे भावतील, समाजमनांतील बुरसटलेल्या मानसिकतेला दूर करीत मानवतेचा विश्वास, विचार पेरत राहतील, अशी खात्री आहे.