बहिणाई
"प्रस्तुत 'बहिणाई' या काव्यसंकलनात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना सर्व कवी-कवयित्रींनी आणि लेखकांनी अत्यंत भावपूर्ण, काव्यात्म आदरांजली वाहिलेली आहे. साहित्य वाचताना सातत्याने एक गोष्ट जाणवते की यातील लेखक-कवींच्या काव्यरुपातून जणू बहिणाबाईच आपल्याशी संवाद साधत आहेत असेच वाटत राहते. कवितांचा विषय 'बहिणाबाई' असून बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व ज्ञात-अज्ञात छटा अत्यंत प्रत्ययकारिरित्या व्यक्त करण्यात हे साहित्यिक यशस्वी झाले आहेत. बहिणाबाईंची गुणवैशिष्टये आपल्या काव्यातून खूप प्रभावीपणे मांडली आहेत. खानदेशच्या मातीतल्या या भूमिकन्या आपल्या सुखदुखाची गाणी गाताना बहिणाबाईच्या रूपकातून स्वतःचं जगणंच जणू उलगडून दाखवत आहेत असं वाटतं.
'बहिणाई' पुस्तक संकलित करणाऱ्या बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचं कार्य निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. ट्रस्टकडे असलेल्या बहिणाबाईंच्या दैनंदिन वापरातील वस्तू संग्रह रूपात जतन करून त्यांचा कविता संग्रह, त्यांच्यावर लिहिलेल्या संदर्भ साहित्याचेही संकलन असून ते अभ्यासकांना, संशोधकांना उपलब्ध करून दिले जात आहे. याकामी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष श्री. अशोक जैन यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते." (प्रस्तावनेतून...)