ऐसा हा आकांत
‘देशोन्नती’ या दैनिकात २०१५ ते २०१६ या कालावधीत श्रीकांत तिडके यांनी ‘उजेडाची पाऊले’ या सदराखाली नियमितपणे स्तंभलेखन केले. त्या २३ लेखांना संग्रहित करून तो संग्रह पुस्तकरूपात त्याची मित्रमंडळी प्रकाशित करताहेत. स्तंभलेखनाचीही एक गंमत असते. संपादकांनी दिलेल्या मर्यादित अवकाशात लेखकाला आपलं विस्तीर्ण वैचारिक आकाश मांडायचं असतं. दुसर्या शब्दात सांगायचं झालं, तर संपादकाने दिलेली शब्दमर्यादेची घागर त्यात लेखकाला आपल्या विचाराचा सागर बसवायचा असतो. खरेतर ही कसरत असते. ती लीलया श्रीकांतने पेलली आहे, हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. आशयशून्य ‘बुढ्ढी के बाल’ लेखकांच्या व वक्त्यांच्या मांदियाळीमध्ये आशयसंपन्न व आशयघन लिखाण करणारा लेखक व वक्ता म्हणून डॉ. श्रीकांत तिडके उठून दिसतात. या लेखसंग्रहाच्या माध्यमातून ती प्रचिती मला आली. (प्रस्तावनेतून...)