शेतकऱ्याची कविता : शोषण आणि जागृती
डॉ. गजानन जाधव हे आपल्या संस्थेच्या मोताळा येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य आहेत. ग्रामीण भााग, कष्टकरी वर्ग आणि काबाडकष्ट करणारा शेतकरी ही त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे शेतकर्यांच्या कवितेविषयी वैचारिक मांडणी करणारे हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची कृषिविषयक वैचारिक परंपरा कवितेच्या अंगाने उलगडून दाखविणारे हे लेखन लक्ष वेधून घेणारे आहे. त्यांचे हे लेखनकार्य कौतुकास्पद असल्यामुळे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. वास्तविक समाजातील कुठल्याही वर्गापेक्षा शेतकर्यांच्या श्रमाला अधिक महत्व आहे. मात्र दुर्दैवाने त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा नाही. त्यांच्या उत्पादनाचे बाजारमूल्य त्यांना मिळत नाही. जो समाजाला जगवतो त्या अन्नदात्याला बहुसंख्य असूनही लोकशाहीमध्ये खरा न्याय मिळत नाही. त्यामुळे शेतकर्याची परिस्थिती अत्यंत गंभीर, भीषण झाली आहे. ती बदलणे अत्यंत गरजेचे, अपरिहार्य आहे. त्यासाठी निदान ग्रामीण भागाशी ज्यांची नाळ जोडलेली आहे; त्या सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा या कृषिप्रधान भारताची श्रमनिष्ठ संस्कृती त्यांना कधीच माफ करणार नाही. असा संदेश देणारे हे कवितेसंबंधीचे पुस्तक आवर्जून वाचण्यासारखे आहे. पुढील लिखाणासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
-श्री हर्षवर्धन उपाख्य भय्यासाहेब देशमुख