युगनिर्माता महाराज सयाजीराव गायकवाड
प्रतिकूल परिस्थितीत जन्माला येऊन बडोद्यासारख्या राज्याचे अधिपती होण्यापर्यंतच्या प्रवासात महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या अंगी असलेली ज्ञानलालसा पूर्ण करण्यासाठी लागणारी चिकाटी त्यांच्यात होती. राज्याची सूत्रे हाती आल्यानंतर महाराजांनी देश-विदेशात पर्यटन करून व विविध राष्ट्रांच्या उत्कर्षाचे अध्ययन करून त्याचा उपयोग आयुष्यभर आपल्या जनतेच्या प्रगतीसाठी केला. सामाजिक सुधारणेवाचून समाजाची सर्वांगिण प्रगती होणार नाही. या विचाराने महाराजांनी आपल्या आचार, विचार व हाती असलेल्या राजसत्तेच्याबळावर समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य केले. महाराजांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत प्रजेच्या कल्याणासाठी आरोग्य, शेती, न्यायव्यवस्था, महसूल, कायदे, जलव्यवस्थापन, उद्योग-धंदे अशा सर्वच बाबींवर लक्ष केंद्रित करून एक आदर्श राज्याची निर्मिती केली. थोडक्यात, ते अत्यंत कुशल प्रशासक होते यात तीळमात्र शंका नाही. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी देशाच्या सर्वांगिण जडण-घडणीत योगदान देणार्या सर्वच क्षेत्रातील नेते, क्रांतिकारक, संस्था, संघटना, गट व विचारकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वार्थाने मदत देण्याचे कार्य केले. महाराजांनी आपल्या या अफाट दातृत्वामुळेच हिंदुस्थानच्या इतिहासात आपले वेगळे स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या महान विचाराने, कृतीने व त्यांनी योजलेल्या विविध योजनेतून आधुनिक स्वतंत्र भारत, उद्यमशिल भारत उदयास येण्याची पार्श्वभूमी निर्माण केली गेली.