एकांकिका : संकल्पना, स्वरूप व वाटचाल
एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. “एकांकिका ही एकरसात्मक, एककेंद्री, एकजिनसी नाट्यकृती असते. काव्यप्रकारात भावगीताचे जे स्वरूप आहे, तेच नाट्यप्रकारात एकांकिकेचे. एकांकिकेत एकच प्रसंग व एकच घटना असते. तिच्यामध्ये उपकथानकांना अवसर नसतो. अत्यंत मोठ्या संदर्भाचा गतिमान भार घेऊन एकांकिकेची सुरुवात होते. या संदर्भामुळे नाट्यवेग एकसारखा वाढत जातो. आणि तो उच्च बिंदूला येताच एकांकिका संपते. प्रसंगांच्या आणि व्यक्ती चित्रांच्या अनावश्यक तपशिलांच्या काटछाटीतून एकांकिकेचे सामर्थ्य एककेंद्रित होते. एकांकिकेत वापरलेला प्रत्येक शब्द नाट्य गर्भ आणि अभिनयगर्भ असल्याविना तिला सामर्थ्य आणि सौंदर्य लाभत नाही.”