असे ... तसे
दै. निर्मल महाराष्ट्र या दैनिकातून २००३ या वर्षी चालवल्या गेलेल्या ‘असे... तसे...’ या नावाच्या स्तंभलेखनाचा हा संग्रह आहे. छोट्या व नव्या दैनिकांना मोठ्या व प्रचंड खपाच्या दैनिकांच्या तुलनेत आपल्या वाचकांची वेगवेगळ्या विषयांची, विवेचक, विश्लेषक, बौद्धिक, वैचारिक अशा वाचनाचीही भूक भागवायची असते व ती भागवण्याची जबाबदारीही संपादकाची असते, याचे भान बाळगून असणार्या प्रभाकर कोंडबत्तुनवार या संपादकाने, आग्रहाने प्रस्तुत लेखकाकडून करून घेतलेले हे स्तंभलेखन वाचकाला आपल्या भवतालातील, समकालीन जीवनातील महत्त्वाच्या विषयांचे भान आणून देण्याच्या हेतूनेच प्रेरित असलेले लेखन होते. जीवनाकडे समग्रतेने बघण्याची दृष्टी वाचकाला प्रदान करणे ही लेखकाचीही जबाबदारी पार पाडण्याची संधी असे स्तंभलेखन लेखकाला देत असते. तशी ती प्रस्तुत लेखकाला लाभली. हे लेखनही त्याचीच परिणती.