जयप्रकाश नारायण कार्य आणि कर्तृत्व
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महान सुपुत्रांपैकी जयप्रकाश नारायण एक होते. त्यांचे जीवन म्हणजे कोणत्याही विचारसरणीला वा वादाला बांधिल न राहाता येणार्या परिस्थितीला सामोरे जात एक नवी दिशा, नवीन वाट व नवा प्रकाश देवून मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या शाश्वत मुल्यांचा स्विकार करुन त्यासाठी आग्रही असलेला जीवन प्रवास म्हणजेच ‘जयप्रकाश’ होय. एकंदरीत जयप्रकाश यांचा जीवन प्रवास अधोरेखित करतांना इटालीचा स्वातंत्र्यसेनानी गॅरिबॉल्डीची आठवण होते. हा स्वातंत्र्यवीर इटालीला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर कोणत्याही फळ-पदाची अपेक्षा न करता आपल्या मुळ गावीं जावून शेती करतो. तशीच स्थिती जयप्रकाश यांची आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहर्निश कष्ट घेतलेत.आज होणारे भ्रष्टाचार, शिक्षणातील शोषण, सत्तेसाठी वाटमारी, युवक, शेतकरी आत्महत्या, खेड्यांची भकास अवस्था, १९९० नंतर बदललेल्या जागतिकीरणाच्या प्रक्रियेने निर्माण केलेले कळीचे प्रश्न, नवीन मध्यमवर्गातील संकुचीत भाव, मुलतत्ववादाचा वाढता प्रभाव, मिथकांचे इतिहासीकरण यामुळे पुन्हा भारतीय लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीतून जेपींच्या विचारधनाचा पुन्हा नव्याने अभ्यास होण्याची गरज आहे. म्हणून प्रा. डॉ. संभाजी पाटील यांनी जयप्रकाशजींवर लिहिलेला ग्रंथ मोलाचा ठरेल.