साक्षात्कारी संत वै. गुरुवर्य ह. भ. प. रामभाऊ महाराज नरवेलकर
‘भाव तेथे देव’ हे सुभाषित लक्षात घेतल्यास, रामभाऊ महाराजांविषयी आपल्याही मनात त्यांचे उच्च दर्जाचे पावित्र्य, साधुत्व याविषयी शंका असण्याचे कारण नाही. त्यांनी आयुष्यभर केलेली पांडुरंगाची भक्ती म्हणजेच, ‘विश्वी विश्वंभर’ या न्यायाने मानवजातीची सेवाच केली. ते ‘न लगी जावे वनांतर’ असे जगले. म्हणूनच ‘सुखे घरा येतो नारायण’ असा रामभाऊ महाराज यांना आपल्या स्वतःच्याच घरी स्वतःचेच कार्य करीत असताना पांडुरंग भेटीचा आणि कृपेचा लाभ झाला. रामभाऊ महाराजांनी त्यांच्या सबंध आयुष्यात केलेल्या सत्संगाच्या कार्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहेच. तरी पण नवीन-नवीन तयार झालेले कीर्तनकार, भजनी मंडळी, पंचक्रोशीतील तरुण पिढी यांनादेखील त्यांच्या कार्याची अचूक माहिती व्हावी व त्याद्वारे सर्वांना एक प्रकारचे आध्यात्मिक मार्गदर्शन व्हावे हे उद्दिष्ट समोर ठेवून व त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन “वै. ह. भ. प. रामभाऊ महाराज नरवेलकर एक साक्षात्कारी संत” हे पुस्तक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.