मुंबई बंबई बॉम्बे
श्री बाळासाहेब लबडे हे तरूण पिढीतील एक प्रयोगशील कवी आहेत. अभ्यासक आहेत. जागतिकीकरणातील जीवनातील विविध अनुभवांनी त्यांच्या कवितेला एक चिंतनशीलता प्राप्त करून दिलेली आहे. प्रारंभपासून आपल्या आगळ्यावेगळ्या अनुभवविश्वामुळे त्यांनी रसिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. त्यांचा मुंबईची विविधरूपे टिपणारा 'मुंबई बंबई बॉम्ब' हा कवितासंग्रह बहुचर्चित आहे. या संग्रहात समाविष्ट करण्यात आलेल्या कविता मुंबईचे कंगोरे प्रकट करणाऱ्या आहेत. मुंबई संबंधीची विविध रूपे प्रकट करणारी त्यांची ही कविता महत्वपूर्ण आहे. मराठी समीक्षेला या संग्रहाला वगळता येणार नाही. मुंबईची ही सारी रूपे पण नजरेत भरणारी. मुंबईचे जीवघेणे बकाल रूप इथे दिसते. जेथे मानवी मूल्यांना कवडीचेही स्थान नाही, अशी ही मुंबई. अत्याधुनिक मुंबईची सारी रूपे विशेषतः बकाल रूपे टिपताना कवी पारंपरिक प्रतिमा, उज्वल परंपरा आणि भक्तीची प्रतिके, यांचा वापर करतो. त्यामुळे मुंबईची ही सारी रूपे अधिक प्रभावीपणे प्रकट होत जातात. येथे एक तान निर्माण होते. मानवी मूल्यांची जपवणूक आणि जगण्याची रेटारेटी असा हा इथला तान आहे. म्हणून कवी टाळ, मृदंग, वारी, मुंबादेवी आणि वारकरी परंपरा यांचा वापर प्रतिमा आणि प्रतिके म्हणून करीत जातात. त्यातून मुळचा अनुभव अधिक प्रत्ययकारी होत जातो. बाळासाहेब लबडे यांचे मुंबई संबंधीचे आकलन मुंबई संबंधीचे असतेच पण त्याचवेळी ते आजच्या भयान वास्तवाचे ही असते. मराठीतील प्रयोगात्म पण महत्वाची कविता म्हणून या संग्रहाकडे पहावे लागते. - प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले माजी अध्यक्ष अ.भा.म. साहित्य संमेलन, चिपळूण.