मनस्वी
क्रीडा क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केलेल्या घराण्यातील मानसी जोशींनी, नात्यांचा गोफ विणताना शब्दांशी केलेली सहेतूक क्रीडा म्हणजे या कविता आहेत. कुठलाही आविर्भाव नसलेल्या, आपल्या अनुभवाशी अत्यंत प्रामाणिक असलेल्या या रचनांमधला निरागस भाव पुन्हा पुन्हा जाणवत राहतो. मुळात बाईचं व्यक्त होणं हेच मुळी कवितेसारखं लोभस असतं. इथे कवयित्रीला उगीचच वैश्विक होण्याचा सोस नाही. आपल्या आवाक्यातलं जगणं कसं सुंदर करता येईल हाच ध्यास कवितांमधून उजागर झाला आहे. मुलगी, बायको, गृहिणी, सखी, आई ते कर्तबगार लढवय्यी स्त्री अशी स्त्रीची विविध रुपे या संग्रहात आली आहेत. पाठीवर लेकरू घेऊन लढणार्या झाशीच्या राणीची तुलना मुलाना स्कुटीवर नेणार्या आधुनिक स्त्रीशी करताना एकूणच बाईच्या भारीपणाचं सूत्र कवयित्रीला गवसलेलं असतं. जे जे कळलं, अनुभवलं ते प्रांजळपणे सांगण्यासाठी मानसी जोशींची कविता हीच सखी असते. म्हणून कवयित्रीने कवितेशी कवितेतून केलेली हितगूज म्हणजे या कविता आहेत. नात्यातली ओल टिकवू पाहणार्या या काव्यलेखनाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
- दासू वैद्य.