मुलं जमिनीवरचे तारे
रंजन आणि प्रबोधन करणारी बालकविता
कवी गोविंद पाटील यांचं ‘मुलं जमिनीवरचे तारे’ हे नवं पुस्तक. विविध विषयांवरील बालकवितांचा हा खजिना आहे. कवी श्री. गोविंद पाटील हे शिक्षक असल्याने त्यांना मुलांचं भावविश्व चांगल्यारितीने ज्ञात आहे. रंजनातून प्रबोधन कसं करावं, याची त्यांना जाण आहे. म्हणूनच त्यांच्या बालकविता ह्या रंजनाबरोबरच प्रबोधन आणि उद्बोधन करणार्या आहेत. त्यांच्या कवितेत निसर्ग, प्राणी यासोबत मोबाईल, संगणक यांची नवी ओळख होते. कवीने पालेभाज्यांमधून हेदखील अलगद संदेश दिला आहे.
‘जो खाईल पालक
तो सुदृढ बालक
जो खाईल पोकळा
स्वभाव बनेल मोकळा’
अशा सहज सुंदर कवितेच्या ओळी मुलांसोबतच त्यांच्या पालकांना देखील भावतील.
मुलं ही देवाघरची फुलं असतात. मुलं ही जमिनीवरचे तारे असतात. या तार्यांसाठी ही कविता म्हणजे चांदण्यांची बाग आहे. यांची मनसोक्त सैर करण्यासाठी सर्वांनी हा संग्रह वाचावा. यातच या कवितांची कमाल आहे. धम्माल करण्यासाठी वाचूया - मुलं जमिनीवरचे तारे!
- आबा गोविंदा महाजन