विज्ञानातील शोधांची नवलाई
गरज ही शोधांची जननी आहे. तसेच कुतूहल हे शोधांची प्रेरणा आहे. तर, चिकित्सा ही शोधांची कसोटी आहे. नवनवे शोध मानवी जीवनाला विकासाचे पैलू मिळवून देतात. ते समजाऊन घेतले तर बालपणापासून मुले चिकित्सक बनतात. भवतीचा परिसर, निसर्ग आणि परिसंस्था याबद्दल विचार करायला लागतात. स्वीडनच्या ग्रेटा थुनबईप्रमाणे अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे बाळकडू त्यांच्या अंगात भिनते. आपल्या भल्यासाठी आपणच लढले पाहिजे, ही स्फूर्ती त्यांना लाभते. जी मोठी माणसे चुकतात, त्यांना धारेवर धरण्याची क्षमता त्यांच्यात येते. भारत पेट्रोलियम या नामांकित कंपनीतून देशाच्या पश्चिम विभागाचे गुणवत्ता आश्वासन प्रबंधक म्हणून निवृत्त झालेले आणि वसईच्या हरित वसई पर्यावरण चळवळीचे एक शिलेदार असलेले व सध्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विकास समितीचे आणि वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य असलेले व ज्येष्ठ लेखक श्री. जोसेफ तुस्कानो यांनी नव्या नवलाईच्या शोधांचे अंत:करण उलगडून दाखविले आहे. त्यातून कुमार मंडळीत वैज्ञानिक दृष्टीकोण रुजण्यास खचितच हातभार लागेल, अशी आम्ही आशा करतो.
या संग्रहातील नवलाईचे शोध मुलांना विज्ञान जगताकडे बघण्याची एक छोटी खिडकी व्हावी, ही नम्र अपेक्षा.