सर्वस्पर्शी
भाषा हा एक संकेत असून सार्वजनिक अभिसरणाचे ते एक साधन आहे. त्याचा वापर आणि उपयोग कवितेतून करतांना तो समाजापर्यंत नेमका गेला पाहिजे. हे नेमकेपण प्रतिभावंताच्या सृजनाला चिरंजीव करण्यास कामी येते. माझ्या या विधानाची बऱ्यापैकी पूर्ती करणारी 'सर्वस्पर्शी' या काव्यसंग्रहातील कविता वाचनात आली. म्हणूनच माझे हे अल्पाक्षरी सुतोवाच.
कवयित्री सौ. सुनंदा रमेश सोनार यांच्या प्रस्तुत 'सर्वस्पर्शी' या काव्यसंग्रहाचे नजरेत भरणारे वैशिष्ट्य म्हणजे 'विषय वैविध्य' म्हणूनच संग्रहाचे शीर्षक यथायोग्य व संयुक्तिक वाटते. संग्रहाचं प्रत्येक पान काव्यप्रकारांचं प्रमाण देत जातं. उदा. मुक्तछंद, अभंग, अष्टाक्षरी, गेय कविता सावरून कवयित्रीच्या काव्यनिष्ठा आणि काव्याभ्यास याचाही प्रत्यय संग्रहाचे वाचन करतांना वाचकास यावा.
रंजन आणि प्रबोधन, मानवी मन आणि जीवन हे घटक केंद्रस्थानी आपसूक आलेले दिसतात. साध्या, सोप्या आणि सहजी भावशब्दांची सुरेख विण साधाणाऱ्या सौ.सुनंदाताई यांनी आपल्या सृजनातून जपलेलं वास्तवभान मला त्यांची काव्यप्रकृती वाटते.
शिक्षिका ते लोकशिक्षिका असा काव्यलेखन प्रवास करणाऱ्या सौ. सुनंदा रमेश सोनार यांचा हा काव्यसंग्रह साहित्य प्रांती पहिला वहिला असला तरी त्यांच्या सृजनशक्तीची पाळंमुळं सक्षम व समृद्ध असल्यामुळे भविष्यातही त्यांचे हातून ताकदीचे लेखन होईल, हा ठाम विश्वास वाटतो. त्यांच्या या समाजहितैषी लेखन कार्यास मी सुयश चिंतितो.
- प्रा. वा. ना. आंधळे, एरंडोल जि. जळगाव.