माझे तुकाराम हाऊ टू अचिव्ह सक्सेस
आज संतांचे कार्य नव्या पिढीला सांगणे एक खूप मोठे आव्हान आहे. कारण साधू-संत म्हटले की त्यांना देव-धर्म असा अर्थ समोर येतो. आधुनिक समाजाला संतांचे कार्य आणि धर्म काहीतरी गूढ वाटतं. त्यांचा देवावर, संतांवर, कशावरच लवकर विश्वास बसत नाही. विज्ञानाने समाजावर जी पकड बसविली आहे, त्यात अशा गोष्टींना महत्त्व नाही. संतांचे विचार लोकांना पटले तरी ते स्विकार करत नाही. खरं सांगायचं झाल्यास लोकांचा कशावरच लवकर विश्वास बसत नाही. अगदी स्वतःवर सुद्धा विश्वास नाही. अशा परिस्थितीत जे मौलिक विचार संतांनी मांडून ठेवलेत ते कसे स्वीकारतील ? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचा विचार करायला लागले तेव्हा वाटल की आधुनिक समाजाला त्यांच्या संकल्पनेत बसतील आणि पटतील अशा पद्धतीने संतांचे विचार मांडायला हवेत. संत म्हटले की अध्यात्म, हा जो एक विचार समाजाने गृहीत धरला आहे, तो बदलवू शकतो, जेव्हा त्यांच्या संकल्पनांना आजच्या स्वरूपात आपण मांडू.आज समाज आधुनिकतेचे नवीन उच्चांक गाठत आहे. पण समस्या आजही आहेत. आधुनिक समाजाच्या आधुनिक समस्या, प्रत्येकाला यशस्वी आणि सुखी व्हायचं आहे. अनेक स्वप्नं उराशी बाळगून जगतोय. प्रचंड स्पर्धा आहे. प्रत्येकाला या स्पर्धेत टिकून राहायचं आहे. पैसा आहे पण समाधान शोधतोय. घर आहे पण नाती संपुष्टात आली आहेत. ऐहिक सुख आहे पण मनुष्य खरे सुख शोधतोय. यश, पैसा, नाव हे सगळे मिळविण्याच्या प्रयत्नात आहोत. याच समाजाची दुसरी बाजू निराशा येते. कधी आत्मविश्वास गमावून बसतो. सत्य आणि असत्याची जाण नाही. नीती मूल्यांना पायदळी तुडवून यश प्राप्त करण्याची मनीषा. अशा स्वरूपातल्या समस्यांशी रोज सामना होतो आणि म्हणूनच कुठेतरी हे बदलायला हवं. तुकोबारायांना वाचताना एवढे मला जवळचे वाटायला लागलेत की 'माझे तुकाराम' झालेत. वाटलं की त्यांच्या विचारात एक परिवर्तनीय शक्ती सगळ्यांनाच एक वैचारिक व्यक्तिमत्त्व बनविण्यास मदत करते.