वात्सल्यसिंधू
आई कुणाचीही असो आई ही आईच असते. वात्सल्य सिंधू हा ‘आई/ माय’ या विषयावर केंद्रीभूत असलेल्या कवितांचा व ललित लेखांचा संग्रह आहे . प्रसिद्ध समीक्षक डॉ. सुधीर रसाळ आपल्या ‘काव्यालोचना’ या ग्रंथात कवितेविषयी लिहितात, “वास्तवाचा अर्थ सांगणारी अमूर्त व सामान्य तत्वे मांडणे हे शास्त्रीय गद्याचे कार्य असते. काव्य हेही सामान्य असते. परंतु ते विशिष्ट अनुभवाचा प्रत्यय घडवीत असताना सामान्य बनते. हा विशिष्ट अनुभव विशिष्ट व्यक्तीचा, स्थळाचा व काळाचा असूनही तो कुठल्याही व्यक्तीचा, स्थळाचा, काळाचा असू शकतो, अशी जाणीव काव्यातून व्यक्त होत असते. काव्यात वास्तवाच्या तपशिलाला महत्त्व नसते म्हणून वास्तवाचे विस्तारपूर्वक वर्णनही नसते. काव्यातील शब्द वास्तवाकडे अंगुली निर्देश करीत नसतात, असे नाही. हा अंगुली निर्देश केला जात असतानाच काव्यात शब्दांचा नाद, त्यांची अर्थवलये यावर लक्ष खेचून घेतले जाते. म्हणून काव्यातील शब्द हे साधन असतानाच साध्य असतात. शब्दांना शब्द म्हणून काव्यात महत्त्व असते. थोडक्यात काव्यात कल्पित गद्यापेक्षा रूपक प्रक्रिया अधिक प्रभावी असते किंबहुना तो काव्याचा प्राणच असतो असे म्हणता येईल.” या संग्रहातील अनेक कवितांमधून असा काव्यानुभव वाचकांना येईल.