दुष्टचक्र
सौ. वृषाली नरेंद्र खैरनार यांनी ‘दुष्टचक्र’ कथासंग्रहातून दु:खाचे दुष्टचक्र दर्शविणार्या कथा लिहिल्या आहेत. अतिशय वाचनीय अशा अंतर्मुख करणार्या एकोणवीस कथा या संग्रहात आहेत. कथालेखक हा सर्वात मोठा समाजनिरीक्षक असतो. असावा. समस्या, घटना, त्याची कारणे, त्याचे परिणाम कथालेखक डोळसपणे पाहत असतो, अनुभवत असतो. त्यामागील सामाजिक चिंतन तो करत असतो. घटना, प्रसंग, माणसं, घटनेचा समकाल, न्याय, अन्याय, शोषण, पोषण, रूढी, परंपरा, सामाजिक संकेत, लोकसंकेत, आधुनिकता, पारंपरिकता, वर्तनातली गुंतागुंत, प्रमाणभाषा, लोकभाषा अशा कितीतरी परस्परपूरक आणि विरुद्ध गोष्टींचे अन्वय आणि संबंध कथालेखक लावत असतो. आरसा ही एकसंघ वस्तू असली तरी ती अनेक घटकांचा संघ असते. आरशात पहाणार्या प्रत्येकाला आपण दिसत असतो. कथासुद्धा आरसाच असतो. अनेक व्यक्ती, घटना, आणि त्यांच्यातील ताणेबाणे दाखवणारा, संगत आणि विसंगत तपशिलांची सुसंगत घटना म्हणजे दुष्टचक्र मधील कथा आहेत. कथेत ‘कथन’ हे प्रयोजन असते, पण सांगण्यापलीकडचे सांगणे हे मुख्य प्रयोजन कथेचे असते. जे या संग्रहातील कथांना साधले आहे.