आसवांचा विद्रोह
कविता या वाङ्मय प्रकाराचे महत्त्व आणि सौंदर्य इतर वाङ्मय प्रकारापेक्षा उंचीचे गणले गेले आहे. त्याचे कारण मानवी भावनेला हात घालण्याचे व मानवी आयुष्याला संस्कार क्षम करण्याचे सर्वश्रेष्ठ सामर्थ्य या प्रकाराला निसर्गदत्त लाभलेलं आहे. तसा ठोस पुरावा म्हणजे सातशे वर्षांपूर्वी लिहिलेलं आजही घराघरात व मनामनात अक्षर झालेलं माऊलींचे ‘पसायदान’ होय. कविता ही अल्पाक्षरी व नववोन्मेषाली असल्याने या प्रकाराची ओढ लेखनकर्त्याइतकीच वाचकासही असते. अगदी पाळणातल्या बाळाला निज यावी म्हणून ती अंगाईच्या रूपातनं समोर येते; तर कधी दु:खाचा निचरा व्हावा म्हणून ही तिची आळवणी केली जाते, तर कधी बंडाचा झेंडा हाती घेऊन अन्यायविरूद्ध एल्गार पुकारते. पुराण ग्रंथापासून ते वर्तमानस्थितीचा मानवी जीवनासह चराचराचा परीघ लिलया व्यापणार्या या वाङ्मय प्रकारानं कालपरत्वे स्थित्यंतर स्वीकारत आपले स्थान अढळ ठेवले आहे.